मुख्य पान धुळे जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
धुळे जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सुची
समिती
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
नाविन्यपुर्ण उपक्रम
  

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना

  
प्रस्तावना

एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम (IRDP) , ग्रामीण युवकांना प्रशिक्षण ( ट्रायसेम) , ग्रामीण क्षेञातील महिला व बालविकास ( डवाक्रा) , ग्रामीण भागातील पारंपारिक कारागिरांना सुधारीत हत्यार संच पुरविणे ( सिंट्रा ), गंगा कल्याण योजना (GKY) या पाच योजनांच्या एकत्रिकरणातून स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना (SGSY) दि. 1 एप्रिल 1999 पासुन सुरू करण्यात आला आहे. हा एक सर्वांगीण विकास कार्यक्रम असून त्यामध्ये स्वयंसहाय्य गटांमध्ये गरिबांची संघटना तयार करणे, प्रशिक्षण , पत, कर्ज, तंत्रशास्त्र मुलभुत सुविधा आणि पणन यांसारखे स्वयंरोजगाराचे सर्व पैलु अंतर्भुत आहेत.

निधी

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेला केंद्र व राज्यांकडून 75:25 या प्रमाणात निधी पुरविण्यात येतो.

ध्येय

ग्रामीण भागातील गरीब जनतेच्या क्षमतेवर आधारीत असे ग्रामीण क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणावर छोटे उपक्रम सुरू करणे हे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे उद्दिष्ट आहे. सहाय्यीत कुटुंब हे व्यक्ती किंवा गटात असेल तरी देखील गट पध्दतीवर भर देण्यात येईल . प्रत्येक सहाय्यीत कुटुंबाला तीन वर्षामध्ये दारिद्रय रेषेच्यावर आणणे हे स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे ध्येय असेल.

उद्येश

ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना स्वरोजगाराचा कार्यक्रम देवून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणणे व त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुळ उद्येश आहे.

वैशिष्टे

  • ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील स्वरोजगाराची अंगभुत कौशल्ये आणि क्षमता यांना योग्य पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी केंद्र शासनाने केलेली आहे.
  • दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील सदस्यांचे स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करून गटांसाठी एकूण तरतुदीच्या 75 टक्के अनुदानावर खर्च करण्यावर भर देणे.
  • दारिद्रय रेषेखालील वैयक्तिक कुटुंबातील स्वरोजगारींना उद्योग व्यवसायासाठी कर्ज व अनुदान उपलब्ध करून देणे.
  • प्रत्येक सहाय्य केलेल्या कुटुंबाला 3 वर्षात दारिद्रय रेषेच्यावर आणणे.
  • छोटे छोटे उद्योग व्यवसाय स्थापन करतांना किंवा अर्थ सहाय्य करतांना कार्य संकुलावर भर यासाठी स्थानिक साधन संपत्ती, स्थानिक लोकांचे व्यवसाय कौशल्य आणि बाजार पेठेची उपलब्धता यावर आधारीत असलेल्या प्रत्येक पंचायत समिती गटासाठी 4 ते 5 मुख्य व्यवसाय निवडून त्यासाठी कर्ज व अनुदान देण्यावर भर

प्रत्येक सहाय्य केलेल्या कुटुंबाला दरमहा उद्योग व्यवसायापासून कमीत कमी रू. 2000/- निव्वळ उत्पन्न मिळेल यादृष्टीने उद्योग व्यवसाय निवडण्यासाठी बँक व यंत्रणेकडून मार्गदर्शन करण्यात येते.

योजनेमध्ये कर्ज हा महत्वाचा घटक असल्याने बँकेचा सहभाग महत्वाचा आहे.

बचत गटांना प्रथम प्रतवारीमध्ये पात्र ठरलयानंतर त्यांच्या बचती एवढे किंवा कमीत कमी रू. 5000/- खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे. अशा गटांना खेळते भांडवलाच्या दुप्पट बँक कर्ज उपलब्ध करून देते.

स्वरोजगारींना व्यवसायानुसार पायाभुत दिशा निदर्शन व किमान कौशल्यवाढीसाठी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे खालील भाग आहेत

  • एकूण उदिदष्टांच्या 60 टक्के निधी अनुदानाकरिता.
  • एकूण उद्यिष्टांच्या 10 टक्के निधी खेळते भांडवलाकरिता .
  • एकूण उद्यिष्टाच्या 10 टक्के निधी प्रशिक्षणाकरिता .

मुलभुत सुविधांसाठी 20 टक्के निधी राखीव.

स्वयंसहाय्य बचत गट संकल्पना

  • स्वयंसहाय्य बचत गटामध्ये कमीत कमी 10 ते 20 सदस्य असावेत.
  • अपंग स्वरोजगारी / लघुसिंचनासाठी स्वयंसहाय्यता गटातील सदस्य यांची कमीत कमी संख्या 5 असणे आवश्यक आहे. उर्वरीत बाबतीत कमीत कमी 10 सदस्य व जास्तीत जास्त 20 सदस्य.
  • या योजने अंतर्गत स्थापन करावयाच्या बचत गटामध्ये शक्यतो सर्व सदस्य दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील असणे गरजेचे आहे. अपवादात्मक परिस्थितीत 20% किंवा जास्तीत जास्त 30% दारिद्रय रेषेबाहेरील सदस्य घेता येतील.
  • बचत गटाचे खाते ते गाव ज्या बँकेकडे दत्तक आहे, त्या बँकेत उघडणे आवश्यक आहे.
  • स्थापन करावयाचे बचत गट 50 % अनुसुचित जाती जमातीच्या सदस्यांचे तसेच 40 % महिला सदस्यांचे असावेत.
  • बचत गटाचे खाते अध्यक्ष, सचिव यांच्या संयुक्त नावाने उघडणे आवश्यक आहे.
  • बचत गटाची सभा महिन्यातून किमान एकदा होणे आवश्यक आहे.
  • बचत गटाच्या एक महिन्यात दोन सभा होणे आवश्यक आहे.
  • गटाने स्वत-ची नियमावली तयार करणे आवश्यक आहे.
  • गटाने पुढीलप्रमाणे दप्तर ठेवणे गरजेचे आहे. सभासद प्रवेश अर्ज, जमा खर्च नोंद वही, उपस्थिती नोंदवही, अभिप्राय नोंदवही, सदस्यांचे राजीनामे अर्ज, कर्ज मागणी अर्ज, मंजुरी पत्र गटाकडे जमा असलेल्या बचतीमधून अल्प व्याजदराने गटातील सदस्यांना आंतरीक कर्ज पुरवठा करता येईल. गटाबाहेरच्या व्यक्तिला कर्ज देता येणार नाही.
  • गटाने सामाजिक कार्यात सहभागी होणे आवश्यक आहे. जसे ग्रामीण स्वच्छता, लसीकरण, वृक्ष लागवड इत्यादी.
  • गटांचे सहा महिन्यानंतर मुल्यांकन, प्रथम प्रतवारी करण्यात येईल. ही प्रतवारी बँक शाखा अधिकारी स्वयंसेवी संस्था, गट विकास अधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचेकडून करण्यात येईल.
  • प्रथम प्रतवारी मध्ये बचत गट पात्र ठरल्यानंतर व बँकेने शिफारस केल्यानंतर बचत गटाला बचती एवढे किंवा कमीत कमी रू. 5,000/- खेळते भांडवल यंत्रणेकडून उपलब्ध करून देण्यात येते.
  • खेळते भांडवल बँकेला जमा झाल्यानंतर खेळते भांडवलाच्या दुप्पट बँक गटाला कर्ज मंजुर करेल.
  • गटाला खेळते भांडवलाच्या दुप्पट मंजूर कर्ज अधिक खेळते भांडवल अशी एकूण रकमेची पतमर्यादा बँक गटाला मंजुर करेल.

देय अनुदान

  • अनुसुचित जाती / जमातीतील स्वरोजगारीला प्रकल्प खर्चाच्या मंजूर कर्जाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रू. 10,000/-
  • सर्व साधारण वैयक्तिक स्वरोजगारीला प्रकल्प खर्चाच्या मंजुर कर्जाच्या 30 टक्के किंवा जास्तीत जास्त रू.7,500/-
  • स्वयंसहाय्यता बचत गटासाठी प्रकल्प खर्चाच्या, मंजुर कर्जाच्या 50 टक्के किंवा प्रती स्वरोजगारी रू. 10,000/- प्रमाणे किंवा जास्तीत जास्त रू. 1,25,000/-
  • सिंचनाच्या व्यवसायासाठी मात्र वरीलप्रमाणे अनुदानाची आर्थिक मर्यादा नाही.

प्रशिक्षण

निवडलेले उद्योग / कौशल्ये आणि प्रत्येक स्वयंरोजगारी व्यक्तीची गरज पाहून कौशल्ये वाढविण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो.

अंमलबजावणी

स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पंचायत समिती मार्फत राबविली जाते. नियोजन, अंमलबजावणी प्रक्रियेत बँका व इतर स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येतो.